चित्रपट सृष्टीतून एक वाईट बातमी समोर प्रख्यात चित्रपट निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं निधन झाले आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहलाज निहलानी हे गेल्या काही काळापासून यकृताशी संबंधित आजारांशी लढा देत होते. त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, मृत्यूशी त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. गुरुवार, 4 जून रोजी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.
दरम्यान, FWICE चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी पहलाज निहलानी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "सिनेसृष्टीसाठी हा एक मोठा धक्का आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे पहलाजजी यांचं निधन झालंय..."
पहलाज निहलानी यांनी 1982 मध्ये 'हथकडी' या सिनेमाद्वारे निर्माता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये एक अत्यंत परिचित नाव असलेल्या निहलानी यांनी निर्माता म्हणून अत्यंत यशस्वी कारकीर्द घडवली. त्यांनी 'आँखे', 'अंदाज', 'शोला और शबनम', 'तलाश', 'रंगीला राजा' आणि 'ज्युली 2' यांसारखे अनेक हिट सिनेमे दिले. गोविंदा आणि दिव्या भारती ही पहलाज निहलानी यांची आवडती जोडी, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांनी या दोघांसोबत अनेक सिनेमे केले.