वयाचा अवघ्या 19 व्य वर्षी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या एका तरुणीचं हे मात्र फक्त एक स्वप्नच बनून राहिले आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीचा खदानीत बुडून दुर्दैवी अंत झाला असल्याची मनाला अक्षरशः चटका लावणारी घटना घडली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात घडली आहे. प्रीती काशीराम भाकड असे या मृत तरुणीचे नाव असून, पोलीस भरतीचा सराव करत असताना हा भीषण अपघात घडला. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत खदानीचे संचालक आणि प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अंबड शहरातील रहिवासी असलेली प्रीती भाकड ही गेल्या काही काळापासून आगामी पोलीस भरतीची कसून तयारी करत होती. दररोज पहाटे उठून धावणे, पोहणे आणि इतर शारीरिक कसरतींचा सराव करणे हा तिचा नित्यक्रम होता. 4 जून रोजी नेहमीप्रमाणे ती सरावासाठी शहरापासून काही अंतरावर असलेल्या वळवंडा शिवारातील एका पाण्याने भरलेल्या खदानीच्या परिसरात गेली होती.
सराव करत असताना अचानक तिचा अंदाज चुकल्याने ती खदानीच्या खोल पाण्यात बुडू लागली. प्रीतीला पाण्यात बुडताना पाहून तिथे उपस्थित असलेल्या इतर मुलांनी तात्काळ आरडाओरड केली. काही जणांनी तिला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या खोलीमुळे आणि गाळामुळे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि प्रीतीचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने वळवंडा शिवारातील घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या आणि पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर प्रीतीचा मृतदेह खदानीबाहेर काढण्यात आला. मृतदेह तात्काळ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मात्र, तिथे उपस्थित डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. प्रीतीच्या मृत्यूची बातमी समजताच तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण अंबड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या हृदयद्रावक घटनेनंतर प्रीतीच्या कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. योग्य सुरक्षा व्यवस्था नसताना आणि निष्काळजीपणा केल्यामुळेच प्रीतीचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. मयत तरुणीचे वडील काशीराम भाकड यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. खदानीचे संचालक आणि संबंधित प्रशिक्षकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे अंबड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.