सध्या अपघातांचे प्रमाण वाढले असून आता पर्यंत समृद्धी महामार्गावर अनेक भीषण अपघात झाले आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा समृद्धीवरील एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. आज पुन्हा एकदा बुलढाण्याच्या मेहरकरजवळ भीषण अपघात झाला. पिंपरी माळी येथे एका खासगी लक्झरी बसने समोरून जाणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिली. यामध्ये बसचा समोरून चेंदामेंदा झाला
आज ( 8 जून) पहाटे झालेल्या हा अपघात अत्यंत भीषण होता. यात बसचा चक्काचूर झाला. अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
'बाबा ट्रॅव्हल्स'ची ही खाजगी लक्झरी बस असून ती पुण्याहून नागपूरच्या दिशेने जात होती. पिंपरी माळी गावाच्या शिवारात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस समोर चाललेल्या ट्रकला जाऊन धडकली.
लक्झरी बसची धडक एवढी तीव्र होती की बसच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे दीड ते दोन तास प्रवासी त्या भागात अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि महामार्गावरील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले. जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोघा प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. समृद्धी महामार्गावची वेगमर्यादा आणि चालकाची डुलकी अपघाताला कारणीभूत ठरले आहेत का? या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.