नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- जयभवानी रोड लोणकर मळा परिसरात तब्बल आठ महिन्यांनंतर पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास लोणकर मळा परिसरातील शेतामध्ये बिबट्या फिरताना दिसून आला. यावेळी तो भक्ष्याच्या शोधात असल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बिबट्या शेत परिसरात काही काळ वावरत होता. त्याने डरकाळी फोडल्याने परिसरातील नागरिकांची झोप उडाली. आवाज ऐकून अनेकांनी घराबाहेर येत परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी बिबट्या शेत परिसरात फिरताना दिसल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे शेतकरी व परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जयभवानी रोड, लोणकर मळा व आसपासच्या भागात यापूर्वीही बिबट्याचा वावर आढळून आला होता. मात्र गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून बिबट्याचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे नागरिक काहीसे निर्धास्त झाले होते. आता पुन्हा बिबट्या दिसल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतात काम करणार्या शेतकर्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष अॅड. नितीन पंडित यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. परिसरात वन विभागाने नियमित गस्त घालावी तसेच बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांनीही वन विभागाने त्वरित उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांनी एकटे बाहेर न पडता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वन विभागाकडून या घटनेची दखल घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.