११ जून २०२६
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- उलट्या दिशेने येणार्या स्कूल बसमुळे भीषण अपघात होऊन विंगरमधील प्रवासी जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास द्वारकाजवळील उड्डाण पुलावर घडली.या अपघातामुळे पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील द्वारका परिसरामध्ये सातत्याने विकास कामे सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तरी देखील काही जण त्याचा वापर करत उड्डाणपुलावर जाण्याचा प्रयत्न करतात. उड्डाणपुलाच्या दोन्हीकडील बाजू जाण्यासाठी खुल्या असल्याने या ठिकाणचा वापर केला जातो.
नाशिक-मुंबई महामार्गावरील द्वारका परिसरातील उड्डाणपुलावर आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास स्कूल बस आणि विंगर टेम्पो ट्रॅव्हलर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात विंगरमधील काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, एमएच 15 ईएफ 0158 क्रमांकाची स्कूल बस द्वारका उड्डाणपुलावरून उलट्या दिशेने एनडीसीसी बँकेच्या बाजूने खाली उतरत होती. याचवेळी द्वारकाच्या दिशेने येत असलेल्या एमएच 20 बीसी 7264 या क्रमांकाच्या विंगर टेम्पो ट्रॅव्हलरने बसला जोरदार धडक दिली. धडकेमुळे विंगरमधील काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
द्वारका उड्डाणपुलावर वारंवार होणारे अपघात, तसेच वाहतुकीच्या नियमांचे होणारे उल्लंघन यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.
Copyright ©2026 Bhramar