त्र्यंबकेश्वर - नाशिक त्रंबक रस्त्यावर असलेल्या दुगारवाडी येथील धबधबा हा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून त्याबाबतचा आदेश काढण्यात आला आहे.
पावसाळा चालू झाल्यानंतर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर निसर्गरम्य ठिकाणी जाण्यासाठी तयारी सुरू असते. पावसाळ्याचे चार महिने नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवर नागरिकांची गर्दी होत असते. त्यातून काही दुर्घटना देखील होत असतात. अशीच एक दुर्घटना दुगारवाडी येथील धबधब्या वर झाली आहे. वनविभागाने तसेच जिल्हा प्रशासनाने यापूर्वी नागरिकांना पर्यटन स्थळावर जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. पण तरी देखील नागरिकांकडून फारशी काळजी घेतली जात नसल्याचे लक्षात येते. काल नाशिक रोड येथील मित्रपरिवाराबरोबर गेलेल्या अभिजीत पवार या वीस वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
या घटनेनंतर वनविभागाने अतिशय कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला असून त्र्यंबकेश्वर परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी एक आदेश पारित केला असून या आदेशात सर्व परिस्थिती लक्षात घेऊन जोपर्यंत पुढील आदेश होत नाही तोपर्यंत दुगारवाडी येथील धबधब्यावर जाण्यासाठी पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे. नागरिकांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे. नागरिकांनी या ठिकाणी जाऊ नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील वनविभागाच्या वतीने देवकर यांनी केले आहे.