नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर इथे गेल्या महिन्यापासूनच विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्यापहिल्याच दिवशी संसदेच्या दिशेनं विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. यामध्ये अनेकजण जखमी झालेत. सोमवारच्या संघर्षाची झलक सोशल मीडियावरही पाहायला मिळाली. अनेक सेलिब्रिटींनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा पाठींबा दिला. अशातच रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उघड पाठींबा दिलाय.
रितेश-जिनेलिया पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले?
रितेश देशमुखनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन स्टोरी पोस्ट करत तरूणांच्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिलाय. त्यानं पोस्ट करत म्हटलंय की, "आम्ही आपल्या देशातील तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांचा आवाज मोठ्यानं, स्पष्टपणे आणि निर्भयपणे ऐकला गेला पाहिजे... हे तरुण लोकच आपल्या लोकशाहीचं स्पंदन आणि आपल्या राष्ट्राच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत..."
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनं आपल्या पोस्टमधून इतरांना आवाहनही केलंय. "चला, आपण त्यांचं ऐकुयात, त्यांना पाठिंबा देऊया आणि त्यांना सक्षम करूया... आपल्या तरुणांची ऊर्जा, धैर्य आणि स्वप्न... आपण घडवू इच्छित असलेल्या भारताला आकार देतील...", असं रितेश देशमुखनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. तसेच, आपल्या पोस्टच्या शेवटी रितेश देशमुखनं "जय हिंद..." असंही म्हटलंय. या पोस्टच्या शेवटी रितेशनं 'जिनेलिया आणि रितेश देशमुख' असं लिहिलंय. या पोस्टच्या शेवटी भारतीय तरुण, तरुणांचा आवाज आणि आपल्या देशाचं भवितव्य असे #YouthOfIndia , #VoiceOfTheYouth आणि #FutureOfOurNation हॅशटॅगही रितेश देशमुखनं वापरले आहेत.