नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- मित्रांसोबत सिनेमा पाहून मध्यरात्री घरी परतणाऱ्या नाशिकरोडच्या महाविद्यालयीन तरुणाच्या बुलेटला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाला.
पियुष विलास मोरे (वय २१, रा. सत्यम पार्क, जाचक नगर, जयभवानी रोड, नाशिकरोड) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यासोबत बुलेटवर असलेला अनुराग दुबे हा सैन्यदलात कार्यरत असून, सुट्टीसाठी नाशिकरोड येथे आला असताना मित्रांसोबत सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. या अपघातात अनुराग गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला पुढील उपचारांसाठी तातडीने पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष मोरे हा आपल्या तीन मित्रांसोबत सिटी सेंटर मॉल येथे सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. यामध्ये अनुराग दुबे हा सैन्यदलात कार्यरत असून, सुट्टी निमित्त नाशिकरोड येथे आला होता. मित्रांचे सिनेमा पाहण्यासाठी जाण्याचे ठरल्याने सर्वजण एकत्र गेले होते. चित्रपट संपल्यानंतर मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास पियुष आपल्या बुलेटवर मित्र अनुराग दुबे याला मागे बसवून घरी परतत होता. अन्य दोन मित्र दुसऱ्या दुचाकीवरून त्यांच्या मागोमाग येत होते.
पुणे रोडवरील फेम सिनेमाजवळील शिवाजीनगर भागातील पॉल ढाब्यासमोरून बुलेटने उपनगरच्या दिशेने जात असताना नाशिकरोडकडून आलेल्या भरधाव पिकअपने तपोवन रोडकडे जाण्यासाठी अचानक वळण घेतले. यावेळी पियुषच्या बुलेटची पिकअपला जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की पियुष आणि अनुराग दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पिकअप चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.
अपघाताची माहिती मिळताच भाजप नगरसेवक सतीश निकम यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. पियुष याला त्याचे चुलते राज पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी तपासणी केल्यानंतर पियुष याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, अनुराग दुबे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने पुढील उपचारांसाठी पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सुट्टीसाठी घरी आलेल्या सैन्यदलातील जवानावर अशा प्रकारे उपचाराची वेळ आल्याने मित्रपरिवारासह कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पियुष हा महाविद्यालयीन द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे वडील जळगाव येथे आयटीआयमध्ये कार्यरत आहेत. पियुषच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्याच्या पश्चात आई, वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्यावर संध्याकाळी देवळाली गाव येथील अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणाचा अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार संदीप हिवाळे पुढील तपास करीत आहेत.