डोंबिवलीतील बहुचर्चित डॉक्टर मारहाण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि परिचारिकेला मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत
या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी कल्याण न्यायालयात तब्बल १८३२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. कल्याण न्यायालयाचे न्यायाधीश एम. पी. वासाडे यांच्या न्यायालयात आज आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या १५ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे.
विष्णूनगर पोलिसांनी सादर केलेल्या या १८३२ पानांच्या दोषारोपपत्रात रमेश म्हात्रे यांच्यासह प्रमोद निकम, रमेश पवार, अक्षय करांडे आणि साधना करांडे या पाच आरोपींचा समावेश आहे. रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला आणि परिचारिकेला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा गंभीर आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. आज न्यायालयात झालेल्या प्रक्रियेनंतर आता सरकारी पक्षाकडून सर्व कागदोपत्री आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे बचाव पक्षाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
३ महिन्यांत खटला संपवण्याचे उद्दिष्ट मुंबई उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचे हे गंभीर प्रकरण येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत जलदगतीने चालवून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान, १८३२ पानांचे दोषारोपपत्र असल्यामुळे त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी रमेश म्हात्रे यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे काही दिवसांची मुदत मागितली आहे. या मुदत मागणीवर न्यायालयाने अद्याप अंतिम निर्णय दिलेला नसून, पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी १५ सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे.