चालकाचा बेजबाबदारपणा ! 5 वर्षांच्या चिमुकलीचा कचऱ्याच्या गाडीखाली चिरडून  मृत्यू ; परवाना नसताना गाडी चालवायला दिली
चालकाचा बेजबाबदारपणा ! 5 वर्षांच्या चिमुकलीचा कचऱ्याच्या गाडीखाली चिरडून मृत्यू ; परवाना नसताना गाडी चालवायला दिली
img
Nandini khandare More
महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाच्या धडकेत निगडी येथे  पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. चालकाचा बेजबाबदारपणा आणि मदतनिसाच्या निष्काळजीपणामुळे संस्कृती भागवत बिरादार या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे.  या ५ वर्षांच्या बालिकेचा चिरडून मृत्यू झाल्याची थरारक घटना घडली.या प्रकरणी निगडी पोलिसांनी धडक देणाऱ्या वाहनाचा मूळ चालक आणि परवाना नसताना गाडी चालवणारा मदतनीस या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार , मूळ वाहनचालक राजू कुमार गायकवाड (वय ३८, रा. ओटास्कीम, निगडी) याला त्याचा मदतनिस राहुल लक्ष्मण चौहान (वय २८, रा. साने चौक, चिखली) याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (परवाना) नाही, हे पूर्णपणे ठाऊक होते. असे असूनही गायकवाडने कचरा संकलन वाहनाचे स्टेअरिंग चौहानच्या हातात सोपवले.

परवाना नसलेला मदतनीस राहुल चौहान हा बेदरकारपणे गाडी चालवत होता. रस्त्यावरून जात असताना कचरा वाहनाने आधी एका दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरून चाललेली चिमुकली संस्कृती थेट रस्त्यावर खाली पडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कचऱ्याची गाडी थेट तिच्या अंगावरून गेली आणि ती वाहनाखाली सापडल्याने जागीच चिरडली गेली.

निगडी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मूळ चालक राजू गायकवाड आणि मदतनीस राहुल चौहान या दोघांनाही अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या बेजबाबदार कृत्याची गंभीर दखल घेत १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group