बाप्पाचा  निरोप ठरला शेवटचा ! विसर्जनावेळी एकाच वेळी ६ मुलांचा बुडून मृत्यू
बाप्पाचा निरोप ठरला शेवटचा ! विसर्जनावेळी एकाच वेळी ६ मुलांचा बुडून मृत्यू
img
Nandini khandare More

देशभरात गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा होत असून मात्र दुसरीकडे गणपती विसर्जनावेळी एक दुर्घटना घडली आहे.  तेलंगणामधून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. संगारेड्डी जिल्ह्यात गणपती विसर्जन करताना तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने ६ मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेल्या या लहान मुलांचा अचानक तोल गेला आणि ती खोल पाण्यात बुडाली. एकाच वेळी ६ मुलांचा जीव गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, आनंदात सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीचे रुपांतर क्षणात अत्यंत दुःखात झाले आहे.

बुधवारी तीन दिवसांच्या गणपती गणरायाला देशभरात निरोप दिला. पण विसर्जन मिरवणुकीवर तेलंगणात दुखाचे सावट पसरले. येथील पेड्डाकंजेर्ला गावात गणेश मूर्तींचे विसर्जन करताना सहा मुले बुडून मरण पावली. अपघाताची बातमी पसरताच घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमले. या दुर्घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पेड्डाकनजेर्ला गावातील काही मुले गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नेरेडू चेरुवू येथे गेली होती. विसर्जनादरम्यान ६ मुले पाण्यात उतरली होती. ती खोल पाण्यात पोहोचली आणि बुडू लागली. मुलांना पोहता येत नव्हते आणि त्यामुळे खोल पाण्यात उतरल्यावर ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत, असे काही गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण प्रयत्न अपुरे ठरले.

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघाताशी संबंधित माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. ही दुर्घटना नेमकी कशी झाली? याचा शोध घेतला जात आहे. ही मुले खोल पाण्यात कशी पोहोचली आणि त्यावेळी सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या होत्या? याचा तपास करण्यात येत आहे. पोलीस आणि प्रशासन या घटनेचा तपास करत आहेत. मृत मुलांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group