होम लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. RBIच्या आगामी निर्णयाचा थेट परिणाम कर्जाच्या व्याजदरांवर आणि त्यामुळे गृहकर्जाच्या EMIवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच मोठा मासिक हप्ता भरणाऱ्या कर्जदारांचं टेन्शन वाढलं आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) व्याजदराबद्दल अपेक्षेपेक्षा जास्त आक्रमक भूमिका घेईल अशी शक्यता आहे. विदेशी ब्रोकरेज फर्म नोमुराच्या अंदाजानुसार, RBI यावर्षी डिसेंबरपर्यंत रेपो रेटमध्ये एकूण ५० बेसिस पॉइंट्सची वाढ करू शकतो. त्यामुळे कर्जावरचं व्याजदर वाढण्याची शक्यता आहे, तसेच त्याचा परिणाम होम लोन आणि कार लोनच्या EMIवर होऊ शकतो. ७ ऑक्टोबरला RBIची मॉनेटरी पॉलिसी RBI च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (MPC) बैठक ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या बैठकीतील निर्णय ७ ऑक्टोबरला जाहीर केला जाणार आहे. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा सकाळी १० वाजता मॉनेटरी पॉलिसीची घोषणा करतील.
नोमुराच्या अंदाजानुसार, ऑक्टोबरच्या बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्स, तर डिसेंबरच्या बैठकीत आणखी २५ बेसिस पॉइंट्स वाढ होऊ शकते. असं झालं तर रेपो रेट ५.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
महागाई रोखण्यासाठी व्याजदर वाढीचा अंदाज नोमुराच्या मते, संभाव्य व्याजदरवाढीमागे महागाई नियंत्रणात ठेवणं हा महत्त्वाचा उद्देश असू शकतो. अन्न आणि ऊर्जेच्या किमती वाढल्यामुळे आगामी काळात महागाईचा दबाव वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ब्रोकरेज फर्मने FY27 मधील सरासरी CPI महागाई ५.२ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, FY28 मध्ये ती RBI च्या ४ टक्क्यांच्या लक्ष्याजवळ येऊ शकते, असं म्हटलं आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचाही दबाव कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती महागाईसाठी महत्त्वाचा घटक ठरत आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत १०६ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलसह विविध वस्तू आणि सेवांच्या किंमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रेपो रेट वाढल्यावर बँकांकडून कर्जावरील व्याजदर वाढवलं जाऊ शकतं. त्यामुळे नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसोबतच फ्लोटिंग रेटवरील विद्यमान कर्मदारांच्या EMI वरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, अंतिम निर्णय RBI च्या MPC बैठकीनंतरच स्पष्ट होईल.