अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने तिच्याबाबत सुरु असलेल्या IT रेड्सच्या चर्चेवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. याबाबत तिने थेट एक पोस्टच केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रोड्यूसर वासू भगनानी, जॅकी भगनानी, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि पॅनोरमा स्टुडिओजच्या अनेक ठिकाणांवर आयटीने छापा टाकल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली. मात्र आता काही दिवसांनी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिने याविषयावर मौन सोडलं असून एक स्टेटमेंट जारी केलं आहे. इन्कम टॅक्स रेड्सशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा तिने केला आहे. माझ्याशीर संबंधित कोणत्याही ठिकाणांवर एकही रेड पडलेली नाही. छापा टाकण्यात आल्याच्या या बातम्या म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे सांगत तिने यावरून नाराजी व्यक्त केली. ती चांगलीच संतापलेली दिसली. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर रकुलने एक पोस्ट लिहीली असून या सर्च ॉपरेशनशी आपला दुरान्वये काहीही संबंध नसल्याचे तिने अगदी स्पष्ट शब्दांत मांडलं आहे.
काय म्हणाली रकुल प्रीत ?
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने तिच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर आणि रिपोर्ट्सवर स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या वक्तव्यात तिने स्पष्ट केलं की, “हे सर्च ऑपरेशन माझ्याशी संबंधित नव्हतं.” रकुलने पुढे म्हटलं, “सगळ्यांना माहीत असेल, की मी आर्मी बॅकग्राऊंडमधून येते आणि या इंडस्ट्रीत माझ्या मागे कोणताही गॉडफादर नव्हता. मी केवळ माझ्या मेहनतीच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एक जबाबदार आणि कायद्याचं पालन करणारी नागरिक म्हणून मी वयाच्या 20व्या वर्षापासून नियमितपणे माझे संपूर्ण कर भरत आले आहे.” असं तिने नमूद केलं.
अलीकडे समोर आलेल्या विविध रिपोर्ट्सचं खंडन करत रकुलने परदेशातील कथित बेकायदेशीर व्यवहारांबाबतही स्पष्टीकरण दिलं. तिने सांगितलं की, ती वैयक्तिकरित्या किंवा कोणत्याही प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर परदेशी व्यवहारात सहभागी नाही. “देशात किंवा परदेशात माझ्या नावावर कोणतीही बेनामी मालमत्ता नाही. मला कधीही कुणी मालमत्ता भेट म्हणून दिलेली नाही आणि माझ्या तत्त्वांनुसार मी अशा महागड्या भेटवस्तू स्वीकारतही नाही” असंही तिने पुढे स्पष्ट केलं.