हरमनप्रीत कौरने अचानक टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं ! भावूक पोस्ट करत म्हणाली...
हरमनप्रीत कौरने अचानक टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं ! भावूक पोस्ट करत म्हणाली...
img
Nandini khandare More
भारतीय महिला संघाची दीर्घकाळ कर्णधार राहिलेल्या हरमनप्रीत कौरने सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र हरमनप्रीत कौरने अचनाक टीम इंडियाचं कर्णधारपद सोडल्यामुळे क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.  आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदी तिची जागा कोण घेणार. मात्र, कर्णधारपदासाठी स्मृती मंधाना ही प्रमुख दावेदार आहे. हरमनप्रीत कौरने इन्स्टा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करून कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली.

दरम्यान आता तिने तिन्ही प्रकारांमधील (फॉर्मेट्समधील) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. मिताली राजच्या निवृत्तीनंतर, जून 2022 मध्ये हरमनप्रीतने भारतीय संघाच्या सर्व प्रकारांमधील कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. तिच्याच नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने 2025 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकून पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेसारख्या आणि उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांचा पराभव केला.

 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक 171 धावांच्या खेळीपासून ते 2025 मध्ये विश्वचषक उंचावण्यापर्यंत भारतीय महिला क्रिकेटच्या या संपूर्ण स्थित्यंतराच्या प्रवासात हरमनप्रीत कौर यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

हरमनप्रीत कौरने पोस्टमध्ये काय लिहिलं ? 

हा निर्णय घेणे सोपे नव्हते. यात अनेक वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि असे काही क्षण सामावलेले आहेत जे आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. मी या संघासाठी आणि भारतीय महिला क्रिकेटसाठी माझे सर्वस्व रक्त, घाम आणि वेळ अर्पण केले आहे. काही वेळा मला माझ्या स्वतःच्या खेळाशी आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेशी तडजोड करावी लागली. असेही क्षण आले जेव्हा मला माझी वैयक्तिक कामगिरी, माझी प्रगती आणि माझ्या वैयक्तिक इच्छा बाजूला ठेवाव्या लागल्या, कारण माझा असा विश्वास होता की संघ सर्वात महत्त्वाचा आहे.

हरमनप्रीत कौरने पोस्टमध्ये लिहिले कर्णधार असताना तिला अनेक कठीण निर्णय घ्यावे लागले, असे निर्णय जे नेहमीच सहज समजण्यासारखे किंवा सोपे नव्हते आणि ज्यांची किंमत तिला कधीकधी वैयक्तिक पातळीवर मोजावी लागली. हरमनप्रीत म्हणाली की, मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागे एकच उद्देश होता, संघाला अधिक सक्षम करणे आणि इतर खेळाडूंना प्रगती करण्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि स्वतःचे सर्वोत्तम रूप घडवण्याची संधी देणे. मी सर्व काही अनुभवले आहे. मी अत्यंत कठीण क्षण पाहिले आहेत. हृदयद्रावक प्रसंग, टीका, शंका आणि असे दिवस जेव्हा काहीच आमच्या मनासारखे घडले नाही. आणि मी सर्वोत्तम क्षणही पाहिले आहेत, विजय, जल्लोष, देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान आणि असे क्षण जेव्हा केलेल्या प्रत्येक त्यागाचे सार्थक झाले.

आज मी भावूक होऊन, पण मनाच्या शांततेसह कर्णधारपदावरून पायउतार होत आहे, कारण माझा ठाम विश्वास आहे की माझा संघ आता एका चांगल्या स्थितीत आहे. हा संघ गुणवत्ता, चारित्र्य, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्य असलेला संघ आहे, ज्याची प्रगती पाहण्यासाठी आणि ज्याचा एक भाग राहण्यासाठी मी उत्सुक आहे. मला वाटते की मी माझे कर्तव्य पूर्ण केले आहे. मी या संघासाठी माझे सर्वस्व दिले. मी अभिमानाने ही जबाबदारी पेलली आणि भारतीय महिला क्रिकेटचे नेतृत्व करण्याची विशेष संधी मिळाल्याबद्दल मी सदैव कृतज्ञ राहीन, असं हरमनप्रीत कौर म्हणाली. कर्णधारपदाचा कार्यकाळ आज संपत असेल, पण भारतीय क्रिकेटवरील माझे प्रेम कधीच संपणार नाही.

माझ्या सुख-दुःखाच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या प्रत्येक सहकारी खेळाडूचे, प्रशिक्षकाचे, सपोर्ट स्टाफ सदस्याचे, व्यवस्थापनातील अधिकाऱ्याचे, बीसीसीआयचे, कुटुंबातील सदस्याचे आणि चाहत्याचे मी आभार मानते. रक्त, घाम, त्याग, अभिमान मी हे सर्व काही दिले. आता, केवळ खेळावरील प्रेमापोटी पुन्हा खेळण्यासाठी मी सज्ज आहे. कर्णधारपदाचा अध्याय संपत आहे, पण माझा प्रवास सुरूच राहील, असं हरमनप्रीत कौरने स्पष्ट केलं. 

CRCKET |
इतर बातम्या
Join Whatsapp Group