राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू असून, हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. काही भागांत उन्हाचा चटका जाणवत असतानाच, राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची आज उकाड्यापासून सुटका होणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात आज ढगाळ वातावरण राहिल. या ठिकाणी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.
नैऋत्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आज याची तीव्रता वाढली असून या भागामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याचाच परिणाम म्हणून अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. राज्यातील बळीराजा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. या वर्षी चांगला पाऊस न झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे.
दरम्यान, राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. अनेक जिल्ह्यातील तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सोलापूरमध्ये काल ३७.९ अंस सेल्सिअस तापमान होते. त्यानंतर यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.