महाराष्ट्राच्या राजकारणात 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून नवा वाद निर्माण झाला आहे. दसरा मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना 500 कोटी दिले, अशी भाजपमध्ये कुजबूज सुरु आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला. या आरोपानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
माझ्याविरोधात ३ वर्षापासून षडयंत्र सुरू आहे. हे किती मोठे प्रकरण आहे हे समोर आले पाहिजे. मराठ्यांचे आंदोलन अन्याय करून वेदना देऊन बंद पाडावे असे प्रयत्न केले जात आहेत. मराठा समाजाने प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवावे. निवडणूक काळात, उपोषण काळात हे षडयंत्र रचण्यात आले. मराठा कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा, किती मोठे डाव रचले जातात हे राज्यातील जनतेसमोर ठेवणार आहे असं सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऑडिओ बॉम्ब फोडला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझ्याशी शत्रूप्रमाणे वागू लागलेत. मी कुणाकडून पैसे घेतले नाहीत आणि दिलेही नाही असं शिंदेंनी म्हटलं. मग इतक्या भयंकर स्वरुपाचे षडयंत्र का रचले जाते याचा शोध मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा. माझ्याकडे ५०० कोटींबाबत पुरावे मागितले होते. ते पुरावे मी माध्यमांसमोर मांडतो. महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय नेत्याने हे ऐकले पाहिजे. मराठा असेल वा ओबीसी सगळ्या समाजाने यात बोध घेतला पाहिजे असं सांगत त्यांनी त्यांच्या मोबाईलमधून ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे.