चुलत्याच्या घरात सोन्यावर डल्ला, पैशांतून थार खरेदी! पुतण्याचा प्रताप पाहून सगळेच चक्रावले
चुलत्याच्या घरात सोन्यावर डल्ला, पैशांतून थार खरेदी! पुतण्याचा प्रताप पाहून सगळेच चक्रावले
img
Nandini khandare More

चुलता-पुतण्याच्या नात्याला धक्का देणारा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात समोर आला आहे. चुलत्याच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारून पुतण्याने चक्क महागडी थार गाडी खरेदी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, गाडी खरेदी केल्यानंतर तिच्या पूजेसाठी पुतण्याने चुलत्यालाच घरी बोलावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सातवेमध्ये अवघ्या 19 वर्षीय पुतण्याने चुलत्याच्या घरातील तब्बल 15 तोळे सोन्यावर डल्ला मारून चक्क 10 लाखांची थार खरेदी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोडोली पोलिसांनी समर चव्हाण (वय 19) आणि त्याच्याकडून सोनं खरेदी करणाऱ्या सोनाराला सुद्धा ताब्यात घेतलं आहे. पुतण्या समरने ज्या चुलत्याच्या घरातील सोन्यावर डल्ला मारला त्याच चुलत्याला कार पुजण्यासाठी सुद्धा बोलावलं होतं. थारच्या पूजनासाठी ज्यांच्या घरून चोरी केली त्यांनाच पूजनासाठी बोलावलं आणि चोरी झाल्याचे निष्पन्न झालं. याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत. 

एक महिन्यापूर्वी 15 तोळे सोन्याचे दागिने चोरले
पन्हाळा तालुक्यातील सातवेत समर पोपट चव्हाण त्याच्या कुटुंबीयांसह राहतो. त्याच्याजवळ चुलत चुलते उमेश मारुती चव्हाण राहतात. त्यांच्या घरातून समर चव्हाणने साधारणपणे एक महिन्यापूर्वी 15 तोळे सोन्याचे दागिने चोरले. चोरलेले दागिने गावातीलच सोनार संग्राम बाबासो मोरेला संगनमताने दहा लाख रुपये किमतीला विकले. चोरलेल्या दागिन्यांच्या दहा लाखातून चक्क महिंद्राची 'थार' कार खरेदी केली. नवीन थार घरी आणल्यानंतर कारच्या पूजनासाठी त्याने  चुलते उमेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना बोलावले. पूजनाला जाताना उमेश चव्हाण आणि त्याच्या घरच्यांनी घालण्यासाठी दागिन्याच्या शोधाशोध केला असता ज्या ठिकाणी दागिने ठेवले होते त्या ठिकाणचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. 

आजीचे दागिने जाग्यावर, चुलतीच्या दागिन्यांवर डल्ला
परंतु तिथं एक आश्चर्याची बाब घडली होती. तिथं बाजूला असलेले आजीचे दागिने मात्र चोरीला गेले नव्हते. फक्त उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचे दागिने चोरीला गेले होते. यावरून चोर हा जवळचाच किंवा घरचाच असावा अशी शंका उमेश चव्हाण यांना आली. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोडोली पोलीस ठाण्यामध्ये दागिने चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर उमेश चव्हाणचा पुतण्या समर चव्हाणने अचानक नवीन कार कोठून खरेदी केली? त्यासाठी पैसे कोठून आले? याची चौकशी केली असता समरने चोरी केल्याचं कोडोली पोलिसांना निष्पन्न झालं. कोडोली पोलिसांनी प्रत्यक्षात चोरी करणारा समर चव्हाण आणि त्याची चोरीचे दागिने खरेदी करणारा सोनार संग्राम मोरे या दोघांना ताब्यात घेतल असून त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत करण्याचं तसेच पुढील तपास करण्याचे काम अद्याप सुरू आहे. कोडोली पोलीस ठाण्याचे पर्यवेक्षणाधीन पोलीस उपाधीक्षक श्रीकांत ठिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group