अलीकडे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून आता आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर बूथ प्रतिनिधीला घेऊन जाणारी कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शाळेतील विद्यार्थिनींना धडक दिली असून यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पुण्यातील खेड तालुक्यातील शिरोली-पाईट मार्गावर कुरकुंडी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून, अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. आदिती नवनाथ राळे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अपघातानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी आठच्या सुमारास कुरकुंडी फाट्यावर हा अपघात घडला. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर बूथ प्रतिनिधीला घेऊन जाणारी कार या मार्गावरून जात होती. त्याचवेळी एसटी बसची वाट बघतं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शाळेतील विद्यार्थिनींना या कारने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी मोठी होती की काही विद्यार्थी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना आदिती राळे हिचा मृत्यू झाला. या घटनेने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघातानंतर संबंधित कारचा चालक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पोलिसांच्या कारवाईवरून वाद निर्माण झाला. अपघातग्रस्त वाहन घटनास्थळी ठेवून त्याचा पंचनामा आणि आवश्यक तपासणी केल्यानंतरच ते हलविण्यात यावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र, पोलिसांनी कारचा घटनास्थळी पंचनामा न करताच ती पाईट पोलीस चौकीकडे नेण्यास सुरुवात केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
पोलिसांच्या या कृतीला नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला. यावेळी पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे सांगण्यात येते. अपघातग्रस्त वाहनाला संरक्षण दिले जात असल्याची भावना काही ग्रामस्थांनी व्यक्त करत, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जखमी विद्यार्थ्यांवर योग्य उपचार व्हावेत, अपघाताच्या कारणांचा सखोल तपास व्हावा आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.