शिंदे गटातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असूनया आता छत्रपती संभाजीनगरमधील शिंदेसेनेच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हिडीओ कॉल करत त्यांना १० लाखांची खंडणी न दिल्यास जीवे मारून टाकू अशी धमकी देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांना मारण्यासाठी ५ लाखांची सुपारी घेतल्याची आणि १० लाख रुपयांची खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ कॉल शुक्रवारी रात्री आला होता. या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली. धमकी देणाऱ्या आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे
या धक्कादायक प्रकारानंतर राजेंद्र जंजाळ यांच्यासह कार्यकत्यांनी मध्यरात्री उशिरापर्यंत पुंडलिक नगर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून आरोपीच्या तत्काळ अटकेची मागणी केली. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला. राजेंद्र जंजाळ यांच्या फोनवर हा धमकीचा व्हिडिओ कॉल आला होता. यानंतर त्यांनी थेट पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
शिंदेसेनेचे नेते राजेंद्र जंजाळ यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिस सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात असक्षम ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. धक्कादायक म्हणजे पुरावा नाही म्हणून पोलिसांनी उपमहापौर यांना आलेल्या धमकीबाबत गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे शिंदेसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झालेत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलिस ठाण्यातून न जाण्याचा पवित्रा शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.