शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली होती.या प्रकरणाच तापास अद्याप सुरु असून आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची मंगळवारी विशेष तपास पथकाने प्रथमच चौकशी केली. ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात ही चौकशी सुमारे सात तास सुरू होती. चौकशीदरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे विविध प्रश्नांची सरबत्ती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिंदे यांनी चौकशीत सहकार्य केल्याचा दावा पोलिसांनी केला. पूर्णेकर कुटुंबीयांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर विशेष तपास पथकाने यापूर्वी मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची सात वेळा चौकशी केली आहे. त्यानंतर मीनाक्षी शिंदे यांना चौकशीसाठी कधी बोलावले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुपारी १२.४५ वाजता मीनाक्षी शिंदे ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात दाखल झाल्या. काही वेळाने तपास पथकाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधवही तेथे आले. सुमारे सात तासांच्या चौकशीनंतर रात्री ८ वाजता शिंदे यांना सोडण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी त्यांना प्रदीप पूर्णेकर यांच्याशी काही वैमनस्य होते का, घटनेच्या दिवशी त्या कुठे होत्या, हत्येविषयी त्यांना आधी काही माहिती होती का, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले.
माध्यमांशी बोलताना मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, ‘पोलिस जेव्हा मला चौकशीसाठी बोलावतील, तेव्हा चौकशीला सामोरे जाणार, ही माझी पहिल्यापासूनची भूमिका होती. त्यानुसार मी चौकशीला सामोरे गेले. पुढेही बोलावले तर जाईन.’
उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा प्रयत्न
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला २८ दिवस उलटूनही मुख्य सूत्रधाराला अटक होत नसल्याच्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलनासाठी गेलेले पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. या घटनेनंतर पूर्णेकर कुटुंबीयांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, आगरी-कोळी समाजबांधव आणि नागरिकांनी नौपाडा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या दिला. माजी महापौर व शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती, विभागप्रमुख राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. पोलिस ठाण्याबाहेर ‘रास्ता रोको’ झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हरिनिवास चौक, गोखले रोड आणि कोपरीकडील काही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.
राम पूर्णेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील काही पुरावे सादर केले होते. त्या आधारे राजेंद्र शिंदे यांना २४ तासांत अटक करावी; अन्यथा उपमुख्यमंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला होता. मंगळवारी ते रिक्षाने शिंदे यांच्या निवासस्थानाकडे गेले. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ‘मला न्याय द्या, माझ्या वडिलांची हत्या झाली आहे’, अशी विनवणी करत त्यांनी आक्रोश केला.