नाशिककरांनो लक्ष द्या! त्र्यंबक रोडवरील वाहतूक दिवसातून ३ वेळा बंद; ''या'' चार दिवसांसाठी पर्यायी मार्ग कोणते?
नाशिककरांनो लक्ष द्या! त्र्यंबक रोडवरील वाहतूक दिवसातून ३ वेळा बंद; ''या'' चार दिवसांसाठी पर्यायी मार्ग कोणते?
img
Nandini khandare More

नाशिक-त्र्यंबक रोडने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी काही कालावधीत या मार्गावरील वाहतूक दिवसातून तीन वेळा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या  सहा पदरीकरणाचे काम सुरु आहे. एका बाजूचा रस्ता जवळपास पूर्णत्वास आला असून, उर्वरित दुसऱ्या बाजूचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. दरम्यान याच रस्त्यावरील पिंपळगाव बहुला येथील नंदिनी नदीवरील उजव्या बाजूच्या पुलाच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामानिमित्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी चार दिवस हा रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंगळवार दि. २४ नोव्हेंबर ते गुरुवार दि.२७ नोव्हेंबर २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत पहाटे ०५ ते ०६, दुपारी ०१ ते ०२ आणि दुपारी ०३.३० ते ०४.३० या ठराविक वेळेत सदर मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद  ठेवून पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. नाशिक शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त चंद्रकांत गवळी यांनी याबाबतची अधिकृत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.शहर शोधा

प्रवेश बंद आणि पर्यायी मार्ग

त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे येणारी वाहतूक : सर्व प्रकारच्या वाहनांना पिंपळगाव बहुला जकात नाका येथे प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. ही वाहतूक महिरावणी येथून वळवून गिरणारे मार्गे नाशिककडे येईल.

नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतूक : सर्व प्रकारच्या वाहनांना पिंपळगाव बहुला बस स्टँड येथे प्रवेश पूर्णपणे बंद राहणार आहे. ही वाहतूक अमृत चौक येथून वळवून अशोकनगर-कार्बन नाका-बारदान फाटा मार्गे त्र्यंबकेश्वरकडे जाईल.

दरम्यान या कालावधीत संबंधित ठेकेदार कंपनीने पुलाच्या सर्व बाजूंनी बॅरिकेडिंग करावे, दिवसा व रात्री स्पष्ट दिसतील असे रेडियमचे दिशादर्शक व सूचना फलक लावावेत तसेच वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक वॉर्डन नेमावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा, अन्यथा अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियम आणि मुंबई पोलीस अधिनियमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group