राजकीय घडामोडींना वेग आला असून आता शिंदेंच्या सेनेतून एक मोठी घडामोड समोर आली आहे . चंद्रपुरातून मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. चंद्रपूरच्या पालकमंत्री हटाव अभियान करण्यात आलं. या अभियानाची सुरुवात शिंदे गटाच्या नेत्याने केली. परंतु सत्तेत असतानाही पालकमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेणे शिंदे गटाच्या नेत्याला महागात पडलं आहे. पक्षाने हकालपट्टीची ताकीद दिल्यानंतर स्वत: शिंदेंच्या नेत्याने पक्षाची साथ सोडली.
चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उइके हटाव अभियान सुरू करणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते ललित कासट यांनी पक्षाचा राजीनामा दिला. ललित कासट आणि त्यांच्या समर्थक शिवसैनिकांनी त्यांच्या गळ्यातील शिवसेनेचे पट्टे काढून राजीनाम्याची घोषणा केली. ‘मी कुठल्याही प्रकारे पक्षाचं नाव आणि बॅनर वापरलं नसताना देखील माझ्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याची शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. त्यामुळे माझी शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची ताकीद देण्यात आली.
मात्र मी पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेविरोधात सुरू केलेलं आंदोलन थांबवणार नसल्यामुळे पक्षाचा राजीनामा देत असल्याचं कासट यांनी जाहीर केलं. पालकमंत्र्यांच्या विरोधात सुरू असलेलं आंदोलन पुढेही सुरू राहील, असा निर्वाळा देखील कासट यांनी दिला. ललित कासट यांनी शिंदेंची शिवसेना सोडल्यानंतर काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. आता ललित कासट कोणत्या पक्षात प्रवेश करणार, यावरून चर्चा सुरू झाली आहे. परंतु कासट यांनी कोणत्या पक्षाची साथ धरणार, हे स्पष्ट केलेले नाही.