नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या (शनिवारी) वाजणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत २०२४च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.
देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा उद्या होणार आहे. निवडणुकांच्या घोषणांपाठोपाठ देशभरात आचारसंहिता लागू होईल. निवडणुकीच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य मतदारांचे डोळे लागून राहिले आहेत.
उद्या म्हणजेच शनिवार १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. देशभरातील निवडणुका किती टप्प्यात पार पडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. देशात सात टप्प्यात लोकसभांचे मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोग यंदा मतदान आणि प्रक्रियेबाबत काही नाविन्यपूर्ण घोषणा करणार का, याचीही उत्सुकता आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया महाआघाडी अशी मुख्य लढत होणार आहे. या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.