नवी दिल्ली :
महिला प्रीमियर लीग 2024च्या सेमी फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 5 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणारी आरसीबी आज रविवारी दिल्ली कॅपिटल्ससोबत भिडणार आहे. दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये असून दिल्लीने सलग दुसर्या हंगामात अंतिम फेरी गाठली आहे.
गेल्या हंगामात आरसीबीची कामगिरी फार चांगली नव्हती. मात्र या हंगामात त्यांनी जोरदार कमबॅक केले. आरसीबी पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे ते पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी जीवाचे रान करतील यात शंका नाही. दुसरीकडे पहिल्या हंगामात हुलकावणी दिलेल्या विजेतेपदावर कब्जा करण्यासाठी दिल्ली देखील सगळा जोर लावेल. त्यामुळे यंदाचा फायनल सामना हा दमदार होईल.
वुमेन्स प्रीमियर लीगच्या विजेत्याला किती मिळणार बक्षीस रक्कम?
महिला प्रीमियर लीग 2023 चे विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले होते. त्यावेळी त्यांना विजेते म्हणून 6 कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळाली होती; तर उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला 3 कोटी रुपये मिळाले होते. यंदाच्या प्रीमियर लीग विजेत्यांना किती रक्कम मिळणार याबाबत बीसीसीआयने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच विजेत्या आणि उपविजेत्या संघांना बक्षीस रक्कम मिळण्याची शक्यता आहे.