वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आरसीबीने दिल्लीच्या मुलींचा पराभव करून दिमाखात डब्ल्यूपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे आता आरसीबी फ्राँचायझीने 2,844 दिवसांनंतर ट्रॉफीवर नाव कोरलंय. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्लीने दिलेलं किरकोळ आव्हान आरसीबीला (आरामात पूर्ण करता आलं नाही. दिल्लीने कडवी झुंज दिली. अखेरच्या ओव्हरपर्यंत झालेल्या या सामन्यात रिचा घोषने फोर मारत आरसीबीच्या विजयाचं स्वप्न पूर्ण केलं. आरसीबीकडून श्रेयंका पाटील हिने 4 विकेट्स घेतल्या. तर सोफी मोलिनक्सने 3 खेळाडू बाद केले.
दिल्लीने दिलेलं 114 धावांचं आव्हान आरसीबीसाठी किरकोळ होतं. स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईन यांनी दमदार सुरूवात करून दिली. सोफीने 27 बॉलमध्ये 32 धावांची खेळी केली. तर कॅप्टन स्मृती मानधना हिने 39 बॉलमध्ये 31 धावांची संयमी खेळी केली. स्मृतीने विकेट्स वाचवून एक बाजू संभाळून ठेवली. आव्हान कमी धावांचं असल्याने आरसीबीने घाई न करता शांत खेळी केली. एलिस पेरीने स्मृतीनंतर डाव सावला. रिचा घोषने तिला मोलाची साथ दिली. आरसीबीला अखेरच्या 3 ओव्हरमध्ये 18 धावांची गरज होती. तरीही दिल्लीने कडवी झुंज दिली अन् सामना अखेरच्या ओव्हरमध्ये नेला. अखेर रिचा घोषने खणखणीत फोर खेचत आरसीबीचं स्वप्न पूर्ण केलंय.
त्याआधी, खेळपट्टीचा अंदाज घेता दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कॅप्टन मेग लॅनिंगचा हा निर्णय फलंदाजांनी खोटा ठरवला. स्वत: मेग लॅनिंगला मोठी खेळी करता आली नाही. तिने 23 बॉलमध्ये 23 धावा करत संथ सुरूवात करून दिली. तर दुसऱ्या बाजूने शफाली वर्मा आग ओकत होती. शेफालीने 27 बॉलमध्ये 44 धावांची खेळी केली. त्यावेळी तिने 2 फोर अन् 3 सिक्स ठोकले. मात्र, सलामी जोडीनंतर दिल्लीचे खेळाडू मैदानात टिकू शकले नाही. आरसीबीने दिल्लीला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. आरसीबीकडून श्रेयंका पाटीलने 4 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. तर सोफी मोलिनक्स हिने 3 खेळाडू बाहेर पाठवले. त्यामुळे दिल्लीला फक्त 113 धावांवर रोखण्यात आरसीबीला यश मिळालं.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन):
स्मृती मानधना (C), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (WK), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (C), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (WK), शिखा पांडे, मिन्नू मणी.