रशियात भीषण दहशतवादी हल्ला ; 60 जणांचा मृत्यू तर इतके जखमी
रशियात भीषण दहशतवादी हल्ला ; 60 जणांचा मृत्यू तर इतके जखमी
img
Dipali Ghadwaje
मॉस्को:- रशियाची राजधानी मॉस्कोमधील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री ही घटना घडली. यामध्ये तब्बल 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून 145 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात असून या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपने घेतली आहे.

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर हा मोठा हल्ला घडला आहे. मॉस्कोमध्ये रात्री एक म्युझिक कॉन्सर्ट सुरू होता. त्यासाठी हजारो नागरिक आले होते. त्यावेळी अचानक सहा ते सात हल्लेखोर शिरले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. बंदिस्त ठिकाण असल्यामुळे अनेक जण जागेवरच मृत्युमुखी पडले, कारण तिथून पळण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता. 15 ते 20 मिनिटे हे हल्लेखोर गोळीबार करत होते. त्यानंतर त्यांनी या कॉन्सर्ट हॉलला आग लावली, ज्यामध्ये 40 टक्के भाग जळून खाक झाला.  महत्त्वाचे म्हणजे आयसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.  स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार सुरू झाल्यानंतर स्फोट झाला. एका वृत्तसंस्थेनुसार, आपत्कालीन सेवांनी सांगितले की, लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. त्याचवेळी कॉन्सर्ट हॉलमध्ये लागलेल्या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही व्हिडीओ फुटेजमध्ये कॉन्सर्ट हॉलमध्ये गोंधळ, लोकांचा जमाव हॉलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाजही ऐकू येतो. एका व्हिडीओमध्ये हल्लेखोरही दिसत आहेत. क्रोकस हॉलच्या छतावरून ज्वाळा उठताना दिसत आहेत. 

मॉस्को क्षेत्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या हल्ल्यानंतर 50 रुग्णवाहिकांच्या टीम क्रोकस सिटी हॉलमध्ये पाठवण्यात आल्या. मॉस्को कॉन्सर्ट हॉलच्या तळघरातून 100 लोकांना वाचवण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला.

रशियाच्या सूरक्षा एजेन्सीनुसार, हल्लोखोरांचा शोध घेतला जात आहे. एजेन्सीने यासंदर्भात अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे.  सुरक्षा यंत्रणांनी सांगितले की, हल्ल्याची प्रत्येक अपडेट पुतिन यांना दिली जात आहे. पुतिन यांनी या हल्ल्याबाबत काही भाष्य केले नाही. पण, पुतिन याबाबत बदला घेतील हे निश्चित आहे. युक्रेनच्या नेत्यांचा हात आढळल्यास युद्धाचा मोठा भडका उडण्याची शक्यता आहे.

वृत्तसंस्था स्पुतनिकने दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोमधील अमेरिकन दूतावासाने क्रोकस हॉलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या काही दिवसांपूर्वी संभाव्य हल्ल्याची भीती व्यक्त केली होती. अमेरिकन दूतावासाने 7 मार्च रोजी त्यांच्या वेबसाइटवर एक निवेदन प्रसिद्ध केले होते.

दूतावास नजिकच्या भविष्यात मॉस्कोमध्ये अतिरेकी हल्ला करण्याचा विचार करत असल्याच्या अहवालांवर लक्ष ठेवत आहे आणि अमेरिकन नागरिकांनी पुढील 48 तास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे अमेरिकेने त्याच्या निवेदनात म्हटले होते. हल्ल्यामागे युक्रेनचा हात नाही असा दावा देखील अमेरिकेने केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही रशियाच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, असे म्हटले आहे.

Rassia |
इतर बातम्या
Join Whatsapp Group