घरच्या मैदानावर खेळणार्या चेन्नई सुपरकिंग्जने ‘आयपीएल’ साखळी सामन्यात गुजरात टायटन्सचा 63 धावांनी एकतर्फी धुव्वा उडवला. चेन्नईने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर निर्धारित 20 षटकांत 6 बाद 206 धावांचा डोंगर रचला, तर प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सला 20 षटकांत 8 बाद 143 धावांवर समाधान मानावे लागले.
विजयासाठी 207 धावांचे आव्हान असताना गुजराततर्फे एकाही फलंदाजाला अगदी 40 धावांचा टप्पाही सर करता आला नाही. त्यातच ठरावीक अंतराने गडी बाद होण्याचा सिलसिला कायम राहिल्याने याचा त्यांना मोठा फटका सहन करावा लागला. तिसर्या स्थानावरील साई सुदर्शनने 37 धावा केल्या आणि हीच गुजराततर्फे सर्वोच्च धावसंख्या ठरली. याशिवाय, साहा व मिलर यांनी प्रत्येकी 21 धावा केल्या. चेन्नईतर्फे दीपक चहर, मुस्तफिजूर रहमान व तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 206 धावांचा डोंगर रचला, त्यात शिवम दुबेसह ऋतुराज गायकवाड व रचिन रवींद्र यांच्या फटकेबाजीचा मोलाचा वाटा राहिला. ऋतुराज व रचिन यांनी 5.2 षटकांतच 62 धावांचा फ्लाईंग स्टार्ट दिला, तर ऋतुराजने पुढे अजिंक्य रहाणेसह आणखी 42 धावा जोडल्या.
रहाणे अवघ्या 12 धावांवर बाद झाल्यानंतर शिवम दुबे मैदानात आला आणि त्याने चौफेर फटकेबाजी करत गुजरातच्या गोलंदाजांची बरीच धुलाई केली. दुबेने 23 चेंडूंत 51 धावा झोडपल्या. ऋतुराजने 36 चेंडूंत 46, तर रचिनने 20 चेंडूंत 46 धावांचे योगदान दिले. याशिवाय, डॅरिल मिशेलने 20 चेंडूंत 24 धावा केल्या. गुजराततर्फे राशीद खानने 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना 49 धावांत 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपरकिंग्ज : 20 षटकांत 6 बाद 206 (शिवम दुबे 23 चेंडूंत 51, ऋतुराज गायकवाड 46, रचिन रवींद्र 46. राशीद खान 2-49, साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन, मोहित शर्मा प्रत्येकी 1 बळी).
गुजरात टायटन्स : 20 षटकांत 8 बाद 143. (साई सुदर्शन 31 चेंडूंत 37, साहा 21, मिलर 21. दीपक चहर, मुस्तफिजूर व तुषार देशपांडे प्रत्येकी 2 बळी. मिशेल व पथिराणा प्रत्येकी 1 बळी).