मरुमलारची ड्रविड मुन्नेत्र कझगमचे वरिष्ठ नेते आणि इरोड लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार ए. गणेशमुर्थी (वय ७७) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे २४ मार्च रोजी त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशमुर्थी यांच्यावर कोईम्बत्तूरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज सकाळी पाच वाजून पाच मिनिटाला त्यांच्या छातीत दुखू लागले होते. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
मार्च २४ रोजी खासदाराने विष प्राशन केले होते. त्यानंतर उपचारासाठी इरोडमधील खासगी हॉस्पिटलमध्ये धाव घेण्यात आली होती. त्यांच्यावर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना कोईम्बत्तूर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
तिकीट न मिळाल्याने टोकाचं पाऊल!
गणेशमुर्थी हे तीनवेळा खासदार राहिले आहेत. पक्षातील नेत्यांच्या माहितीनुसार, त्यांचे पार्थिक त्यांच्या इरोडच्या पेरियार नगरमधील घरी आणण्यात येईल. त्यानंतर श्रद्धांजलीसाठी सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात येईल. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी MDMK कडून पुन्हा तिकीट न मिळाल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातो. दुसरीकडे, पक्षातील नेत्यांच्या दाव्यानुसार, घरगुती वादामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर कुटुंबात वाद सुरु होते.