देशात लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत. देशात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना ज्येष्ठ वकील हरिश साळवे, पिंकी आनंद यांच्यासहित ६०० जणांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाई चंद्रचूड यांना पत्र लिहिलं आहे. न्यायालयीन क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढत आहे, अशा आशयाचं पत्र या सर्व वकिलांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना केलं आहे.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पत्र लिहिणाऱ्या वकिलांमध्ये ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांच्या व्यतिरिक्त मनन कुमार मिश्रा, मनन कुमार मिश्रा, आदिश अग्रवाल, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उज्ज्वला पवार, उदय होल्ला, स्वरूपमा चतुर्वेदी यांच्या नावाचा सामावेश आहे.
वकिलांच्या पत्रात काय लिहिलंय?
वकिलांचं म्हणणं आहे की, 'न्यायालयीन क्षेत्रावर एका विशेष गटाचा राजकीय हस्तक्षेप वाढत आहे. सध्या न्यायालयीन कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे. न्यायालयाच्या कामकाजाविषयी जनतेच्या मनातील विश्वासार्हता कमी करणे याबाबी या गटाकडून सुरु आहेत'.
'राजकीय अंजेड्याच्या माध्यमातून कोर्टाच्या निर्णयावर टीका केली जाते. हा गट 'माय वे किंवा हाय वे' या सारख्या सिद्धातांवर विश्वास करतो. तसेच बेंच फिक्सिंग या सिद्धातांवरही विश्वास ठेवतो, असेही पत्रात म्हटलं आहे.
वकिलांचा आरोप आहे की, 'काही नेते काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. हे प्रकरण कोर्टात असेल तर आरोप करणाऱ्या नेत्याच्या मनासारखा निकाल लागला नाही, तर ते कोर्टावर माध्यमांचा आधार घेऊन टीका करतात'.
'काही प्रकरणात न्यायाधीशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. नेत्यांकडून सोशल मीडियावर खोटे पसरवले जात आहे. राजकीय सत्तेच्या माध्यमातून कोर्टाच्या निर्णयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. या बाबीला कोणत्याही स्थितीत स्वीकारता येणार नाही, असंही पत्रात म्हटलं आहे.