केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला ; प्रचारा दरम्यान वाहनांची तोडफोड
केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला ; प्रचारा दरम्यान वाहनांची तोडफोड
img
दैनिक भ्रमर
केंद्रीय राज्यमंत्री आणि मुझफ्फरनगरमधील भाजपचे उमेदवार संजीव बल्यान यांच्या ताफ्यावर शनिवारी सायंकाळी अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. प्रचाराच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याचंही सांगण्यात येत आहे.

या दगडफेकीत सुमारे 15 वाहनांचे नुकसान झाले असून सुमारे 10 जण जखमी झाले आहेत. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात सध्या फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. हा हल्ला सुनियोजित पद्धतीने करण्यात आल्याचे संजीव बल्यान यांनी म्हटले आहे. दरम्यान, या हल्ल्यात संजीव बल्यान बचावले गेले असून सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाबाबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधीर सैनी म्हणाले की, ''भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजीव बल्यान यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधक हताश आणि निराश झाले आहेत. म्हणूनच तो अशा क्षुल्लक गोष्टी करत आहेत.''


'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार ते म्हणाले की, मला मिळालेल्या माहितीनुसार, संजीव बल्यान यांची जाहीर सभा सुरू होती. यावेळी बाहेर जिंदाबाद-मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. अन्य उमेदवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. मला वाटते या हल्ल्यात 6-7 वाहनांचे नुकसान झाले आहे, ज्यात 2-4 लोक जखमीही झाले आहेत. त्यामुळे पराभूत आणि हताश विरोधकांचे हे षडयंत्र आहे, असे मला वाटते. आम्हाला यामध्ये कोणतीही कारवाई करायची नाही. आम्ही हे प्रकरण जनतेच्या दरबारी घेऊन जाणार, तेच याला न्याय देतील.

याप्रकरणी माहिती देताना एसपी सत्यनारायण प्रजापती यांनी सांगितले की, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास खतौली पोलीस ठाण्याच्या मदक्रिमपूर गावात दगडफेक झाल्याची माहिती मिळाली. यानंतर खतौली पोलीस ठाण्याचे प्रभारी तात्काळ फौजफाट्यासह पोहोचले. गावात पोहोचल्यानंतर माहिती गोळा केली असता, येथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची जाहीर सभा सुरू असल्याचे दिसून आले.

जाहीर सभेत काही समाजकंटकांकडून आधी घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर बाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यातील काही वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. सध्या गावात संपूर्ण शांतता व सुव्यवस्था आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. याशिवाय या संपूर्ण घटनेची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे. तक्रार आल्यानंतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group