भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डेनसह मियामी ओपन 2024 या एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. शुक्रवारी झालेल्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात बोपण्णा आणि एब्डेन यांनी क्रोएशियाच्या इवान डोडिग व अमेरिकेचा त्याचा साथीदार ऑस्टीन क्रॅझीकेक या जोडीला पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली.
1 तास 43 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात बोपण्णा - एब्डेन यांनी डोडिग-क्रॅझीकेक यांना 6-7(3), 6-3, 10-6 अशा फरकाने पराभूत केले. बोपण्णा आणि एब्डेन यांनी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती, त्यानंतर आता त्यांनी मियामी ओपन स्पर्धेतही विजेतेपद मिळवण्याचा कारनामा केला आहे.
याबरोबरच 44 वर्षीय बोपण्णा आणि एब्डेन पुन्हा जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल क्रमांकावर आले आहेत. याशिवाय बोपण्णा आणि एब्डेन यांचे एटीपी मास्टर्स 1000 लेव्हलचे हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी या जोडीने इंडियन वेल्स 2023 स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली होती. याशिवाय आता बोपण्णाने एटीपी मास्टर्स 1000 लेव्हलचे विजेतेपद मिळवणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरण्याचा स्वत:चाच विक्रम मोडला आहे. हा विक्रम त्याने गेल्यावर्षी 43 वर्षे वय असताना इंडियन वेल्समध्ये केला होता. परंतु, आता त्याने 44 व्या वर्षी मियामी ओपन जिंकत नवा विक्रम प्रस्तापित केला.
अंतिम सामन्यात पहिल्या सेटमध्ये अव्वल मानांकित बोपण्णा आणि एब्डेन यांना तीन सेट पाँइंट्स मिळाले होते, परंतु दुसऱ्या मानांकित डोडिग-क्रॅझीकेक यांनी तगडी झुंज दिली. त्यामुळे सामना पहिला सेट टायब्रेकरमध्ये गमवावा लागला. परंतु, दुसऱ्या सेटमध्ये चांगले पुनरागमन बोपण्णा आणि एब्डेन यांनी केले आणि हा सेट जिंकत सामन्यात बरोबरी साधली. टायब्रेकमध्ये बोपण्णा आणि एब्डेन यांनी 10-6 असा विजय मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली.