स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडने (एसएफसी) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसह (डीआरडीओ) बुधवारी संध्याकाळी ७ वाजता, ओदिशाच्या किनारपट्टीवरील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम बेटावरुन, अग्नी-प्राईम या अत्याधुनिक प्रकारच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
अंतिम लक्ष्यभेदाच्या ठिकाणी तैनात केलेल्या दोन डाउन-रेंज जहाजांसह वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या अनेक पल्लाविषयक संवेदकांकडून प्राप्त माहितीतून असे दिसून आले आहे की या चाचणीने परीक्षणविषयक सर्व उद्दिष्टांची पूर्तता करून विश्वासार्ह कामगिरी केली आहे. संरक्षण दल प्रमुख तसेच स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडचे प्रमुख यांच्यासह डीआरडीओ आणि भारतीय लष्कराचे अनेक वरिष्ठ अधिकारी या चाचणीच्या वेळी उपस्थित होते.
या यशस्वी परीक्षणाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, एसएफसी आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, ’या क्षेपणास्त्राचे यशस्वी विकसन आणि सेवेतील समावेश यामुळे संरक्षण दलांच्या सामर्थ्यात अनेक पटींनी उत्तम वाढ होणार आहे.’ संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.समीर व्ही.कामत यांनी या यशस्वी उड्डाण चाचणीसाठी एसएफसी तसेच डीआरडीओने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.