यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकून सर्वांचं लक्ष वेधून घेणारा गोलंदाज मयंक यादवला दुखापत झाली आहे. यामुळे लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात तो फक्त एकच षटक टाकू शकला.
एक षटक टाकल्यानंतर तो मैदानातून बाहेर गेला, त्यानंतर परत मैदानात उतरला नाही. पहिल्या षटकात त्याने १३ धावा केल्या. केएल राहुलने डावाचं चौथं षटक त्याला दिलं होतं. १४० किमी प्रतितास वेगाने मयंक गोलंदाजी करत होता. पण तो पहिलं षटक संपताच मयंक फिजिओसोबत मैदानातून बाहेर गेला.
दुखापतीमुळे मयंक यादव दिल्लीकडून खेळताना रणजी ट्रॉफीतून बाहेर होता. मयंक त्याच्या करिअरमध्ये पायाची दुखापत आणि हॅमस्ट्रिंग दुखापतीने त्रस्त राहिला आहे. त्यानं पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने टाकलेल्या वेगवान चेंडूमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. मयंक सतत १५० किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकत होता.
दुसऱ्या आयपीएल सामन्यात आरसीबीविरुद्ध १४ धावा देत ३ विकेट घेतल्या होत्या. आरसीबीविरुद्ध त्याने १५६.७ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. तो आयपीएल २०२४ मधला सर्वात वेगवान चेंडू ठरला.
मयंक यादवने पंजाब किंग्सविरुद्ध १५५.८ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती. त्याने २ सामन्यात ६ विकेट घेतल्या आहेत. मयंकने दोन सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारही पटकावला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच वेगवान गोलंदाजाने करिअरच्या सुरुवातीच्या दोन सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला.