पाकिस्तानी लष्कर आपल्या अत्याचार आणि कारस्थानांमुळे कायमच चर्चेत असते. आज देशात जी राजकीय आणि आर्थिक अस्थिरता आहे, तीही लष्करामुळेच, असे अनेक पाकिस्तानींचे म्हणणे आहे. पाकिस्तानी लष्कराने आपल्याच पोलिसांवर केलेल्या अत्याचाराचे ताजे प्रकरण आता समोर आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये पाकिस्तानी लष्कराने पंजाब पोलिसांच्या एका पोलिस स्टेशनवर हल्ला केल्याचा दावा केला जात आहे.
पाकिस्तानी पत्रकार रऊफ लासरासह अनेकांनी X वर पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे. मात्र, या व्हिडिओला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लष्कराने पोलिसांना बेदम मारहाण केली. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांची चूक ही होती की, त्यांनी लष्करातील जवानाच्या भावाकडून अवैध शस्त्रे जप्त केले होते. यानंतर सैन्याने पोलिस ठाण्यावर हल्ला केला आणि जो कोणी मिळेल त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
या घटनेची माहिती देणारा पाकिस्तानी पत्रकार रऊफ लासराने X वर एक व्हिडिओ पोस्ट केल्यावर तो व्हायरल झाला. त्यांनी X वर लिहिले की, पंजाबमधील भवालनगर येथे मदारिसा पोलिस स्टेशन आणि लष्कराच्या जवानांमध्ये संघर्षाची बातमी आहे. रऊफ लासरा पुढे म्हणाले की, गस्तीदरम्यान पोलिसांना लष्कराच्या कमांडोच्या भावाकडे अवैध शस्त्रे सापडली. यानंतर वाद सुरू झाला आणि त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना जवानांच्या रोषाला सामोरे जावे लागले. युजर्स सोशल मीडियावर लिहित आहेत की, ही बातमी व्हायरल झाल्यानंतर स्थानिक मीडियाला या घटनेचे वार्तांकन न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.