मनमाड प्रतिनिधी : शहर आणि परिसरांत येत्या काही दिवसांत साजरा होणाऱ्या सण - उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरांत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी या उद्देशाने शहरातील उपविभागीय कार्यालय समोरील पोलिस कवायत मैदानावर दंगा नियंत्रणाची चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
येत्या गणेशोत्सव आणि ईद - ए - मिलाद या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस उपाधीक्षक सोहेल शेख मार्गदर्शनाखाली या प्रात्यक्षिकांमध्ये पोलीस दलातील मनमाडसह नांदगाव, येवला तालुका, येवला शहर, चांदवड, वडनेर भैरवसह सहा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे या प्रात्यक्षिकांतून दर्शविण्यात आले.
येथील पोलिस कवायत मैदानावर शुक्रवारी सकाळी तब्बल दीड तास दंगा काबू योजनेची रंगीत तालिम सुरू होती.यात घोषणा देत प्रक्षुब्ध झालेला जमाव चालून येत असताना पोलिसांनी या जमावाला नियंत्रित करण्यासाठी सुरूवातीला पाण्याचे फवारे सोडले.तरीही जमाव काबूत येत नसल्याचे पाहून आक्रमक पोलिसांनी चाल केली.
त्यानंतर झालेली झटापट , यात जखमी झालेला एक इसम आणि त्यानंतर सशस्त्र पोलिसांनी केलेली कारवाई असे या रंगीत तालमीचे स्वरूप होते. ही प्रात्यक्षिके यशस्वी झाली .यामध्ये रुग्णवाहिका , अग्निशामक दल यांनाही सहभागी करून घेण्यात आले.दंगा नियंत्रण प्रात्यक्षिकांसाठी ७ अधिकारी , ५० पोलिस कर्मचारी आणि आरसीपीचे २ प्लॉटून आदी सहभागी झाले होते.