राज्यातील ५ जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं ;  बळीराजा हवालदिल
राज्यातील ५ जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं ; बळीराजा हवालदिल
img
दैनिक भ्रमर
एकीकडे राज्यातील जनता अति उष्णता आणि उकाड्यामुळे हैराण झाली आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटामध्ये आला आहे. हातातोंडाशी आलेले पिक निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. तर काही ठिकाणी या पावसामुळे शेत पिकांसोबत घरांचे देखील नुकसान झाले आहे.

पुणे -
पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी आवकाळी पाऊसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा, राजुरी, कांदळी, येडगाव परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यावेळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कांदा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. खेड तालुक्यातील दावडी, निमगाव, चिंचोशी, शेलपिंपळगाव परिसरात अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे उकड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

अकोला -
अकोल्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. अकोला शहरातील काही भाग आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला. अकोला जिल्ह्यात मागील 3 ते 4 दिवसांपूर्वी झालेल्या गारपीट आणि वाऱ्याच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आजच्या पावसानंही शेत पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. आज दिवसभर अकोल्यामध्ये कडाक्याचे ऊन होते. तापमान वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. अशामध्ये पाऊस पडल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

नाशिक -
नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे आज संध्याकाळनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन विजांचा गडगडाट होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. यावेळी मोरेनगर येथील एका शेतकऱ्याच्या घराजवळ असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेट घेतला. या पावसामुळे या परिसरातील शेतपिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत.

रत्नागिरी -
कोकणातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला. रत्नागिरीतील दापोलीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने दापोलीला झोडपून काढले. जोरदार पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याठिकाणी देखील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

रायगड -
रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला. रायगड जिल्ह्यातील माणगाव, निजामपूर भागात पावसाच्या सरी कोसळल्या. भारतीय हवामान खात्याने रायगडमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. गेल्या आठवडाभर प्रचंड उष्णता आणि तीव्र उन्हाच्या झळांनंतर आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group