जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर ; 'या' भारतीयांना मिळाले स्थान
जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर ; 'या' भारतीयांना मिळाले स्थान
img
दैनिक भ्रमर
2024 मधील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जारी करण्यात आलीय. प्रसिद्ध टाइम्स मासिकानं ही यादी जाहीर केलीय. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि साक्षी मलिक यांच्या नावाचा समावेश आहे. साक्षी मलिक ही ऑलम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये पदक जिंकणारी एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाच्या विरोधात भारतीय कुस्ती महासंघचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात लढा दिल्यामुळं साक्षी मलिकचा प्रभावशाली 100 लोकांच्या यादीत समावेश करण्यात आलाय. त्याशिवाय अभिनय क्षेत्रात तसेच लोककल्याणाच्या कार्यात दिलेल्या योगदानासाठी अभिनेत्री आलिया भट्ट हिला या यादीत स्थान मिळालं आहे.  

अजय बंगा, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांचाही समावेश

दरम्यान, टाइम मासिकानं जाहीर केलेल्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये विश्व बँकचे अध्यक्ष अजय बंगा, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला, देव पटेल यांनाही स्थान मिळालं आहे. टाइम मासिकामध्ये यादीत समावेश झाल्यानंतर साक्षी मलिक हिनं ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. 100 जणांच्या प्रभावशाली लोकांमध्ये भारतीय वंशाचा हॉलिवूड अभिनेता देव पटेल याच्याही नावाचा समावेश आहे. देव पटेल इंडो ब्रिटिश अभिनेता आहे.  यूएस डिपार्टमेंटमध्ये लोन प्रोग्राम ऑफिसमध्ये डायरेक्टर असणारे जिगर शाह यांचाही या यादीत समावेश आहे. शाह यांचा जन्म गुजरातमधील मोडासा येथे झालाय. 

प्रसिद्ध शेफ अस्मा खान यांचाही यादीत समावेश 

प्रसिद्ध उद्योगपती अजय बंगा यांचाही 100 प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये समावेश आहे. अजय बंगा वर्ल्ड बँकच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील पुण्यात झाला आहे. प्रसिद्ध शेफ अस्मा खान यांचाही यादीत समावेश करण्यात आला आहे. अस्मा खान यांचा जन्म कोलकात्यामध्ये झाला असून त्या लंडमधली दार्जिलिंग एक्स्प्रेस या प्रसिद्ध रेस्तराँ च्या मालक आहेत.  त्याशिवाय येल विद्यापीठातील प्रोफेसर प्रियंवदा नटराजन यांचाही यादीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, ईव्ही कार ब्रँड BYD चे सीईओ वांग चुआनफू आणि होम डेकोर ब्रँड IKEA चे सीईओ जेस्पर ब्रोडिन देखील यादीत समावेश करण्यात आलाय. BYD (Build Your Dreams) ला टेस्लाचा प्रतिस्पर्धी बनवण्याचे श्रेय वांग चुआनफू यांना जाते. सौरऊर्जा क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group