कोल्हापूरातील कळंबा कारागृहातील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीच्या खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी५ कैद्यांना अटक केली आहे. कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांनी पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. २ जून रोजी कळंब कारागृहामध्ये हत्येची ही घटना घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुन्ना खान उर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता याची २ जून रोजी हत्या करण्यात आली होती. कळंब कारागृहामध्ये कैद्यांनीच मुन्ना खानची हत्या केली होती. कारागृहातील ५ न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या कैद्यांनी ड्रेनेजच्या लोखंडी झाकणाने मुन्ना खानची हत्या केल्याचे तपासात उघड झाले होते. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी पाचही कैद्यांना अटक केली.
१९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मुन्ना खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा २ जून रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कळंब कारागृहातील हौदावर अंघोळीसाठी गेला होता. यावेळी कारागृहातील इतर कैद्यांसोबत त्याचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की शाब्दिक बाचाबाचीनंतर कैद्यांमध्ये हाणामारी सुरू झाली.
यावेळी कैद्यांच्या एका गटाने मुन्ना खानला बेदम मारहाण केली. है कैदी ऐवढ्यावरच थांबले नाही तर ड्रेनेजच्या लोखंडी झाकणाने त्यांनी मारहाण केली. या मारहाणीत मुन्ना खान गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी प्रतिक उर्फ पिल्या पाटील, दीपक खोत, संदीप चव्हाण, ऋतुराज इनामदार आणि सौरभ सिद या कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या पाचही आरोपींना आज कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान, कळंब कारागृहात सातत्याने गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडत असतात. असे असताना देखील कारागृहात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे