बेंगळुरु येथील एका जोडप्याने ॲमेझॉनवरुन काही सामान मागवले होते. मात्र जेव्हा ॲमेझॉन वरुन आलेले हे पार्सल उघडले तेव्हा त्यातून एक जिवंत कोब्रा बाहेर आला. साप पाहून काही क्षण या जोडप्याची भंबेरीच उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार , रविवारी ही घटना घडली आहे. हे जोडपं सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. त्यांनी ऑनलाइन Xbox कंट्रोलर मागवलं होतं. मात्र जेव्हा पार्सल घरी आलं तेव्हा त्यांनाही एकच धक्का बसला. ॲमेझॉनचे पार्सल जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या पार्सलसोबत साप देखील होता. सुदैवाने हा साप पॅकेजिंग टेपमध्ये फसलेला होता. त्यामुळं कोणालाही त्याने दंश केला नाही.
जोडप्याने या घटनेचा पूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी पुढं म्हटलं आहे की, आम्ही 2 दिवसांपूर्वी ॲमेझॉनवरुन Xbox कंट्रोलर ऑर्डर केले होते. हे पार्सल उघडल्यानंतर त्याच्या आत साप दिसला. पार्सल डिलिव्हरी पार्टनरने आमच्याच हातात दिले होते. बाहेर कुठेही ठेवलं नव्हतं. त्याचबरोबर आमच्याकडे याचा पुरावा देखील आहे.
महिलेने म्हटलं आहे की, सुदैवाने तो साप पॅकेजिंग टॅपला चिकटला होता. त्यामुळं आमच्या घरात किंवा इमारतीत कोणाला काही नुकसान पोहोचवले नाही. इतकी गंभीर घटना असतानाही ॲमेझॉनने आम्हाला दोन तास या परिस्थितीत एकट्यानेच तोडगा काढण्यास सांगितले.
त्यामुळं आम्हाला अर्ध्या रात्री या परिस्थितीचा सामना करावा लागला. आम्हाला पू्र्ण पैसे परत मिळाले मात्र इतक्या विषारी साप आमच्या घरात होता. आमच्या जीवाला धोका होता, हेदेखील तितकेच खरे आहे. हे स्पष्टपणे ॲमेझॉनचा निष्काळजीपणा आहे. त्यांची खराब ट्रान्सपोर्टेशन- वेअरहाऊस स्वच्छता आणि देखरेख नसल्यामुळं सुरक्षेचे उल्लंघन झाले आहे. सुरक्षेमध्ये इतकी गंभीर चुक झाल्यावर त्याचा जबाबदार कोण?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.