शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत एका बाजूने कोसळली आहे. सुदैवाने शाळा बंद असताना ही भिंत कोसळल्याने यात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, त्यानंतर या पडलेल्या शाळेतच विद्यार्थ्यांना बसवण्यात आलं. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ या शाळेची भिंत कोसळली आहे. शाळा बंद असताना भिंत कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. मागील काही दिवसांपासून या शाळेच्या भिंतीला तडे गेले होते. ही बाब स्थानिकांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. मात्र, तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.
दरम्यान धोकादायक इमारतीतच विद्यार्थ्यांना बसवलं जात होतं. मात्र, शाळा बंद असताना अचानक या शाळेची भिंत कोसळली. त्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. आता धोकादायक इमारतीत शाळा सुरू असल्याने काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.