
नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील गंगापूर रोड परिसरात असलेल्या मौजे बेंडकोळी नगर येथे गेल्या एक महिन्यापासुन बिबट्या वन्यप्राण्याचा वावर होता. या परिसरात बिबटयाने पाळीव व भटक्या कुत्र्यांवर हल्ला करुन फस्त केले होते. नागरिकांना देखील बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
त्याअनुषंगाने परिसरातील रहिवासी जितेंद्र अशोक रुईकर यांच्या प्लॉट नंबर ११७ मध्ये वन्यप्राणी बिबट रेस्क्यु होण्यासाठी दि. २९ जुलै रोजी सातपुर वनपरिमंडळातील वन कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात आज मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या लावण्यात आलेल्या पिंज-यात रेस्क्यु झाला आहे.
हा बिबट्या वनविभागाच्या ताब्यात सुरक्षितरित्या असुन त्यास गंगापुर रोपवाटीका येथे ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये बिबट्यांचे वास्तव्य सुरूच असून शहरातील देवळाली कॅम्प येथे रेल्वे मार्गाजवळ एक बिबट्याचा मृत्यू झाला आहे.
नाशिक बरोबरच लागत असलेल्या निफाड, दिंडोरी, सिन्नर, इगतपुरी या परिसरामध्ये सातत्याने बिबट्याचा वावर दिसून येत आहे. बिबट्याचे हल्ले देखील होत असल्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात भितीचे वातावरण देखील दिसून येते.
आज मौजे देवळाली स्टेशन येथे वन्यप्राणी बिबट मादी वय अंदाजे तीन ते साडेतीन वर्ष मृत अवस्थेत मिळुन आली. या वन्यप्राणी बिबट यास ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी नाशिक यांच्याकडून शविच्छेदन करून प्रचलित पद्धतीने गंगापूर रोपवाटीका येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.