राज्यातील शाळांसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल 40 हजार प्राथामिक शाळा आज बुधवारी बंद राहण्याची शक्यता आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी भरतीविरोधात सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी तब्बल 29 हजार शिक्षक आज सामूहिक रजेवर जाणार आहेत. तसेच ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षकांकडून मोर्चा देखील काढणार येणार आहे.
दरम्यान या आंदोलनात राज्यभरातील जवळपास पावणेदोन लाख शिक्षक सहभागी होणार आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असून जवळपास 40 हजार शाळा एक दिवस बंद राहणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारनेसुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका घेतली आहे.
या धोरणानुसार, 20किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर फक्त एकच शिक्षक दिला जाणार आहे. त्यासोबत सेवानिवृत्त शिक्षकाची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे शिक्षक संघटनेकडून या निर्णयाला विरोध केला जात आहे. याची अंमलबजावणी सुरू झाल्यास शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात जाईल, असं शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे. त्यामुळे यावर आता राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाच ठरेल.
राज्याच्या ग्रामीण भागातील 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाईल, अशी भीती देखील शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. शासनाने हे दोन्ही निर्णय तातडीने रदद करावेत यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली मात्र कुठलाच ठोस निर्णय शासनाने घेतला नाही. त्यामुळे सर्व शिक्षक आंदोलनात उतरलेत.