उल्हासनगर : उल्हासनगरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मागील चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३ वर्षीय चिमुकलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडून आला आहे. हिललाईन पोलीस स्टेशनच्या मागील प्रेमनगर टेकडी परिसरात हा मृतदेह आढळून आला असून घटनेनंतर नागरिकांनी पोलीस स्टेशन आवारात गोंधळ घालत कारवाईची मागणी केली आहे.
उल्हासनगरच्या प्रेमनगर टेकडीवर एक महिला तिच्या ३ मुलींसह वास्तव्याला आहे. ही महिला १८ नोव्हेंबरला डॉक्टरकडे जात असताना तिची मुलगी बेपत्ता झाली होती. याबाबत तिने दिलेल्या तक्रारीवरून हिललाईन पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर चार दिवसांनी आज प्रेमनगर टेकडीवरील झाडा-झुडपांच्या परिसरात एका मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवला.
घटनेची माहिती मिळताच उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेत पाहणी केली. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा मृतदेह त्याच बेपत्ता झालेल्या मुलीचा आहे का? तिची फक्त हत्या झाली आहे? की त्यापूर्वी तिच्यासोबत काही दुष्कृत्य सुद्धा झालं आहे? या सगळ्याचा तपास आता पोलिसांकडून सुरू असून वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी समोर येतील, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.
दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला.