निवडून आलेल्या अपक्ष उमेदवाराला मुंबईला घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंकडून हेलिकॉप्टर
निवडून आलेल्या अपक्ष उमेदवाराला मुंबईला घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंकडून हेलिकॉप्टर
img
दैनिक भ्रमर
आज  विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुती सरकारने घवघवीत यश मिळविले असून महाविकास आघाडीसाठी हा धक्कादायक निकल आहे. दरम्यान पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अनेक घडामोडीं  वेग आला आहे.  दरम्यान, जुन्नर विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे येथील  निवासस्थानी भेट घेतली. विशेष म्हणजे सोनवणे विजयी झाल्यानंतर त्यांना मुंबईला घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी  हेलिकॉप्टर पाठवले होते. 

दरम्यान,  या भेटीमुळे अपक्ष आमदार शरद सोनवणे शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद सोनवणे हे शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते व शिवसेनेकडून जुन्नर विधानसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपात जुन्नर मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्याने राष्ट्रवादीने येथून विद्यमान आमदार अतुल बेनके यांना उमेदवारी दिली होती. तर उमेदवारी डावलल्याने नाराज झालेल्या शरद सोनवणे यांनी महायुतीत बंडखोरी करत बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून जुन्नरची विधानसभा निवडणूक लढवत विजय संपादित केला.

तसेच, शरद सोनवणे यांच्या बंडखोरीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा छुपा पाठिंबा असल्याची व निवडणुक काळात शिंदे यांनी सोनवणे यांना मदत केल्याची चर्चाही जुन्नर विधानसभा मतदार संघात रंगली होती. विजय निश्चित होताच शरद सोनवणे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पाठवलेल्या हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाले होते.




इतर बातम्या
Join Whatsapp Group