शेवग्याच्या शेंगा उष्ण असल्याने थंडीत किरकोळ बाजारात शेवग्याच्या शेंगांना मोठी मागणी असते. पण मागणीच्या तुलनेत सध्या बाजारात आवक कमी झाली आहे. परिणामी किलोमागे शेवग्याला प्रतवारीनुसार 500 ते 600 रुपये किलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांनीही शेवग्याकडे पाठ फिरवली आहे.
दक्षिणेकडील राज्यात पावसामुळे शेवग्याच्या लागवडीला फटका बसला तर राज्यात यंदा लांबलेला परतीचा पाऊस आणि त्यानंतरचा अवकाळी पाऊस यामुळे शेवग्याच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला पुण्यासह राज्यातील विविध बाजारपेठांत मागणीच्या तुलनेत शेवग्याची आवक खूपच कमी होत आहे.
किरकोळ बाजारात शेवगा प्रतिकिलो 500 ते 600 रुपये असून दहा ते पंधरा दिवस हे दर कायम राहण्याचा अंदाज व्यापारीवर्तवीत आहेत दर आवाक्या बाहेर गेल्याने शेवगा खरेदी कडे गृहिणींनी पाठ फिरवल्याचे चित्र बाजारात आहे.
बंगालच्या उपसागरात धडकलेल्या चक्रीवादळाचा दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रालाही फटका बसत असल्याचं दिसतंय. राज्यात पावसाच्या धास्तीने शेतकऱ्यांना साठवणुकीतला शेतमाल विकण्याची पाळी आली आहे, तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यात झालेल्या पावसाचा शेवग्याच्या लागवडीला मोठा फटका बसला आहे.