मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक-लेखक, सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.
न्यायालयीन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मराठी साहित्यात मोठी भूमिका बजावली. वर्धा येथे झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. न्यायाच्या गोष्टी, संघर्ष आणि शहाणपण, तीन न्यायमुर्ती आणि त्यांचा काळ, कायदा आणि माणूस, समाज आणि संस्कृती, सावलीचा शोध आदी पुस्तके त्यांनी लिहिली.
चपळगावकर यांनी १९६२ ते १९७८ या काळात बीडमध्ये वकिली केली. त्यानंतर १९७९ ते १९८१ दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. १९८१ पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे न्यायाधीश म्हणून काम केले. मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची १९ जानेवारी १९९० मध्ये नियुक्ती झाली आणि कायमचे न्यायाधीश म्हणून २० नोव्हेंबर १९९० रोजी नियुक्ती झाली. १० एप्रिल १९९९ रोजी ते निवृत्त झाले.
कोणकोणते पुरस्कार मिळाले?
- महाराष्ट्र फाउंडेशनचा दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवन गौरव पुरस्कार
- ‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’ या पुस्तकासाठी भैरुरतन दमाणी पुरस्कार
- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार