भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांनी पटकावला प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार
भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांनी पटकावला प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार
img
Dipali Ghadwaje
संगीत क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित 67 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा सोमवारी (3 फेब्रुवारी) पार पडला. या पुरस्कार सोहळ्या भारतीय वंशाच्या ग्लोबल बिझनेस लीडर आणि संगीतकार चंद्रिका टंडन यांनी बाजी मारली.

‘त्रिवेणी’ या अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. प्राचीन मंत्र आणि जागतिक संगीत यांचा सुंदर मिलाफ या अल्बममध्ये पहायला मिळतो.

71 वर्षीय चंद्रिका टंडन यांनी ‘बेस्ट न्यू एज’, ‘चांट अल्बम’ श्रेणीमध्ये हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. या अल्बममध्ये सात गाणी असून ध्यानसाधनेसाठी आणि मन:शांतीसाठी त्यांची रचना केल्याचं टंडन सांगतात.

या अल्बममध्ये चंद्रिका टंडन यांनी दक्षिण आफ्रिकेतील बासरीवाद वॉटर केलरमन आणि जपानी सेलिस्ट एरु मात्सुमोतो यांच्यासोबत मिळून वैदिक मंत्र सादर केले आहेत. तीन नद्यांच्या संगमावरून या अल्बमला ‘त्रिवेणी’ असं नाव दिलंय. त्याचप्रमाणे यामध्ये तीन वेगवेगळ्या शैलींचंही प्रतिनिधीत्व करण्यात आलं आहे.

“संगीत म्हणजे प्रेम, संगीत आपल्या सर्वांमध्ये प्रकाश प्रज्वलित करते आणि आपल्या आयुष्याच्या अंधाऱ्या काळातही संगीत आनंद आणि हास्य पसरवते”, अशा शब्दांत चंद्रिका टंडन यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group