मुंबई (भम्रर वृत्तसेवा) :- वाढत्या महागाईमुळे वैतागलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दूध खरेदीसाठी आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. आजपासून ही दरवाढ लागू झाली आहे.
बुधवारी दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रज डेअरीमध्ये दूध दरवाढीबाबत महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये विविध सहकारी आणि खासगी संघांचे 47 प्रतिनिधी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, मानद सचिव प्रकाश कुतवळ, संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, श्रीपाद चितळे आणि पुणे जिल्हा संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे या बैठकीस उपस्थित होते. दुधाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे आता गाई आणि म्हशीचे दूध खरेदी करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.
सध्या गाईच्या दुधासाठी 54 ते 56 रुपये मोजावे लागत आहेत. नव्या दरवाढीनुसार आता एक लिटर दुधासाठी 56 ते 58 रुपये मोजावे लागणार आहेत. तर सध्या म्हशीच्या एक लिटर दुधासाठी 70 ते 72 रुपये मोजावे लागत आहेत. नव्या दरवाढीनुसार म्हशीच्या दुधासाठी 72 ते 74 रुपये मोजावे लागणार आहेत.