नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शुक्रवारी रात्री जेईई मेन सेशन- २ चा निकाल जाहीर केला. यामध्ये एनटीएने २,५०,२३६ विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्डसाठी पात्र ठरवले आहे. जानेवारी आणि एप्रिल सत्र एकत्रित केल्यास एकूण २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.
यामध्ये २ मुलींचा समावेश आहे. मागच्या वेळी ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले होते. कोटाचा ओमप्रकाश बोहराने पहिला क्रमांक मिळवला. तर राजस्थानच्या ७ मुलांनी १०० टक्के गुण मिळवले.
एनटीएने जाहीर केलेल्या निकालानुसार, १०० टक्के गुण मिळवलेल्या २४ उमेदवारांपैकी सर्वाधिक ७ उमेदवार राजस्थानचे आहेत. तर महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशचे प्रत्येकी ३, पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्लीचे प्रत्येकी २ उमेदवार आहेत. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी एक उमेदवार आहे.
१०० टक्के गुण मिळवणाऱ्यांमध्ये २१ विद्यार्थी सामान्य श्रेणीतील आहेत. तर ईडब्ल्यूएस, ओबीसी (नॉन-क्रीमी लेयर), एससी श्रेणीतील प्रत्येकी एका टॉपर विद्यार्थ्याला १०० टक्के गुण मिळाले आहेत.
यावर्षी दोन्ही सत्रांसाठी एकूण १५.३९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी १४.७५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल सत्रात जेईई अॅडव्हान्स्डसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
जेईई परीक्षा दिलेले विद्यार्थी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइटला https://jeemain.nta.nic.in/ भेट देऊन जेईई (मेन) 2025 एप्रिल सत्राचा निकाल पाहू शकतात.
ओमप्रकाश बोहरा हे कोटा येथील रहिवासी आहेत. विद्यार्थी अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेच्या मदतीने jeemain.nta.nic.in ला भेट देऊन त्यांचे निकाल आणि स्कोअर कार्ड तपासू शकतात.
राजस्थानच्या कोटामधील ओमप्रकाश बोहरा या विद्यार्थ्याने जेईई मेन परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. जेईई परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणाऱ्या २४ टॉपर्समध्ये २२ मुले आणि २ मुलींचा समावेश आहे. तर पश्चिम बंगालमधील देवदत्त माझी आणि आंध्र प्रदेशातील साई मनोगना गुठीकोंडा या मुलींनी १०० टक्के गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे.