१ मे रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्क येथे परेड होणार आहे. महाराष्ट्र दिन परेडपूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी वाहतुकीमध्ये अनेक बदल केले आहेत.
शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरातील सर्वच रस्त्यांवर १ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक मार्गत बदल राहतील.
मुंबई वाहतूक पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत वाहतूक मार्गातील बदलाची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी वाहतूक वळवण्यात आलेले मार्ग, पार्किंग झोन, नो पार्किंग झोन आणि सार्वजनिक सूचनांबद्दल सर्व माहिती दिली आहे.
या रस्त्यांवरील वाहतुकीत बदल -
केळुस्कर रोड दक्षिण आणि उत्तर हा मार्ग निमंत्रितांना वगळता सर्व वाहनांसाठी बंद राहिल. एस के बोले रोडवर सिद्धिविनायक जंक्शन ते पोर्तुगीज चर्च जंक्शनपर्यंत एकेरी वाहतूक सुरू राहिल. तर सिद्धिविनायक आणि येस बँक जंक्शन दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर रोडवर प्रवेश प्रतिबंधित असेल. पश्चिम उपनगरांकडे जाणारी वाहने सिद्धिविनायक जंक्शन, एस के बोले रोड, पोर्तुगीज चर्च, गोखले रोड, एलजे रोड आणि राजा बडे चौक मार्गे वळवली जातील. दरम्यान, येस बँक जंक्शनवरून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहने पांडुरंग नाईक रोड, राजा बडे चौक, एलजे रोड आणि गोखले रोड मार्गाने जातील.
नो पार्किंग झोन-
केळुस्कर रोड (दक्षिण आणि उत्तर), पांडुरंग नाईक रोड, एन सी केळकर रोड (गडकरी चौक ते कोतवाल गार्डन) हे नो पार्किंग झोन असणार आहे.
नियुक्त पार्किंग (पोलीस/बीएमसी/पीडब्ल्यूडी):
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, वनिता समाज हॉल, महात्मा गांधी स्विमिंग पूल, कोहिनूर पीपीएल, एनसी केळकर रोड, दादर (प.)
परेडचा मार्ग कसा असेल?
ही परेड शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ५ पासून सुरू होईल. त्यानंतर केळुस्कर रोडने (उत्तर) पुढे जाईल, सी. रामचंद्र चौक ओलांडून, सावरकर रोडमार्गा जात ती नारळी बाग येथे समाप्त होईल. त्यामुळे वाहनचालकांनी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच्या दरम्यान वर दिलेल्या मार्गांवरून वाहतूक न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कार पास नसलेल्या नागरिकांना दादर (पश्चिम) येथील जे के सावंत रोडवरील प्लाझा सिनेमाजवळील कोहिनूर पार्किंग लॉटमध्ये वाहन पार्क करण्याची विनंती करण्यात आली आहे. प्रवाशांना मदत करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी संपूर्ण परिसरात पोलिस कर्मचारी आणि फलक तैनात असतील. मुंबई वाहतूक पोलिसांकडून जनतेला सहकार्य करण्याचे आणि परेडच्या वेळेत प्रभावित मार्ग टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.